२२/०४/२०२३
अक्षयतृतीया,वसुंधरादिन,
नासिक
वसुंधरेचा
सुपुत्र
चाकोरी
बाहेर जाऊन एखादी गोष्ट करायची म्हणजे वेडंच असावं लागतं.अशीच एक वेडी आणि वसुंधरेची
सेवेसाठी झपाटलेली व्यक्ती म्हणजे शेखर गायकवाड. त्यांना शालेय जीवनातच निसर्गाप्रती
प्रीती आणि ओढ निर्माण झाली. शालेय जीवनात रविवार पेठेत (नासिक) वाचनालयात गेल्यावर
जंगल झाडे निसर्ग या संदर्भातील पुस्तके वाचत. त्याच काळात घरी एक निळ्या डोक्याचा
पोपट वास्तव्यास आला. त्याचा सांभाळ यांनी सुरू केला त्यानंतर आणखीन दोन पोपट घरात
आले. पावसाळ्यात नैसर्गिक रित्या उगणारी झाडांची रोपटे ते नाजूकपणे काढून आपल्या घराच्या
समोरील मोकळ्या मैदानात लावत असत.
सन १९८९ मध्ये अमृतवाहिनी
पॉलिटेक्निक कॉलेज संगमनेर मधून मेकॅनिकल इंजिनियर ची पदविका घेतली. बंदिस्त कामात
हा तरुण रमणारा नव्हता. नोकरी आपला स्वभाव नाही हे कळायला वेळ लागला नाही. १९९१ मध्ये
थोड्या सामग्री सह या तरुणाने स्वतःचीच यांत्रिकी कार्यशाळा घराच्या आवारातच सुरू केली
पुरेसे भाग भांडवल नसल्याने अनेक गोष्टीत काटकसर केली. कालांतराने त्यांनी आपली कार्यशाळा
मित्राच्या जागेत हलवली व नंतर तिथेच एक एक करत स्वतःची चार गाळे विकत घेतले.
कार्यशाळेत जाताना महापालिकेने लावलेली झाडे दिसत पण त्याची
योग्य जोपासना होत नव्हती. हा तरुण आपल्यापाशी असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीतून झाडांना पाणी टाकायला लागला. वाढत्या शहरीकरणामुळे शेती व झाडे कमी व्हायला लागली.
त्यामुळे आपण झाडी लावली पाहिजे असे त्यांना वाटू लागले. त्याकाळात नासिक शहरात भारनियमन,
लोड शेडिंग मोठ्या प्रमाणात होते मग हा आपल्या कामगारांबरोबर मोकळ्या मैदानात खड्डे
करत असत. कधी पदरमोड करून खाजगी तर कधी शासकीय रोपवाटिकांमधून हा रोपे आणून लावत असत
व त्याची जोपासना ही करत. ही वृक्ष प्रामुख्याने गुलमोहर, रेन ट्री तत्सम विदेशी झाडे
होती. हे करत असताना त्यांच्या लक्षात आले आपण आपल्या वातावरणात वाढणारी प्रदेशनिष्ठ
झाडे लावली पाहिजे. त्यानंतर त्यांनी अभ्यास सुरू केला खाजगी व शासकीय रोपवाटिकेमध्ये
सुद्धा पुरेशा प्रमाणात प्रदेशनिष्ठ उपलब्ध नसत मिळेल तशी रोपटी घेऊन ती लावण्याचे
काम अहोरात्रपणे चालू होते. एक दिवस त्याच्या मनात कल्पना आली, का नाही आपण आपल्या
परिसरात प्रदेशनिष्ठ झाडी लावून लोकांमध्ये जनजागृती करूया. त्यांनी आधी एक अशी कल्पना
केली की २० लिटर ड्रम मध्ये झाडे लावावी व त्यावर झाडांची माहिती पट्टी चिटकवावी पण
ही गोष्ट व्यवहारी नव्हती. घरा शेजारीच एक मोकळी जागा पडली होती तेथील मलबा व कचरा
नगरसेवकाकडून साफ करून घेतला व हळूहळू या मोकळ्या जागेत प्रदेशनिष्ठ झाडी लावण्यास
सुरुवात केली टप्प्याटप्प्याने झाडे लावत आज वीस वर्षात इथे १६७ विविध प्रकारची देशी
झाडी आहेत. त्यामुळे येथे एक परिसंस्था इकोसिस्टम विकसित झाली आहे. पक्षी कीटक फुलपाखरे
यांची रेलचेल या परिसरात आहे. जंगलाचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रभरातून विद्यार्थी
येथे येतात. ह्या उपक्रमास डॉ. प्रकाश आमटे, श्री राज ठाकरे साहेब, श्री. सयाजी शिंदे
तत्कालीन नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त श्री
प्रवीण गेडाम, श्री संजय खंदारे यांनी सुद्धा
भेट दिलेली आहे.
नाशिक शहरातील अनेक लोक शेखर गायकवाड यांच्याशी संपर्क
साधत व आपल्या परिसरातही हा उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त करत. नाशिक शहरात जवळ जवळ
४२ मोकळ्या जागेमध्ये हा उपक्रम केला गेला त्यापैकी ४० ठिकाणी हा यशस्वी झालेला आहे.
महानगरपालिकेनेही श्री शेखर गायकवाड यांच्या सल्ल्याने सहा ठिकाणी अशी उद्याने विकसित
केली आहे.
शेखर गायकवाड यांनी अनेक रस्ते, गोदावरी काठ व तपोवनातील मोकळी जागा इथेही वृक्षरोपण केले आहे दर शनिवार रविवार झाडी लावणे
व या झाडांना पाणी देणे ती जोपासणे हा दिनक्रम
अखंडपणे शेखर गायकवाड यांचा चालू आहे. पूर्वी
ते कावड करून ड्रमणी पाणी देत असत नंतर त्यांनी स्वतः ढकलगाडी तयार केली, त्यावर ड्रम
ठेवून झाडांना पाणी देत असत हे करत असताना अनेक वेळा त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी
असतात, तर अनेक वेळा ते एकटेच असतात व आजही त्यांचा हा वसुंधरा सेवेचा यज्ञ चालूच आहे.
हे सर्व करत असताना मोठ्या प्रमाणात आपल्याला हा
उपक्रम राबवता येईल का व सर्वच शहरवासीयांना यात सामील करून घेता येईल का?, ही कल्पना
शेखर गायकवाड यांच्या मनात आली. ते या उपक्रमासाठी मोठ्या जागेच्या शोधात होते. एका
कार्यक्रमात त्यांची वनाधिकारी श्री माळवे यांच्याशी भेट झाली. त्यांच्यासमोर त्यांनी
ही कल्पना मांडली. त्यांनाही ही कल्पना आवडली. माळवे साहेबांनी लगेच त्यांना मुख्य वन संरक्षक श्री अरविंद पाटील
यांच्याकडे नेले त्यांनाही कल्पना आवडली व वन महोत्सवात हा कार्यक्रम राबवता येईल असे
त्यांनी सुचवले. या उपक्रमासाठी त्यांनी शेखर गायकवाड यांना चार-पाच जागा दाखवल्या
त्यातली सातपूर, नासिक येथील तत्कालीन फाशीचा डोंगर व आत्ताची देवराई ही जागा शेखर
गायकवाड यांनी निश्चित केली. तिथे मोठ्या प्रमाणात
ग्लिरिसीडिया (गिरीपुष्प) होते. या वृक्षांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या खाली गवतही
वाढत नाही त्यामुळे अनेक जण शाशंक होते. पण एवढ्या वर्षाच्या अनुभवामुळे शेखर गायकवाड
ठाम व निश्चिंत होते.
७ एप्रिल २०१५ ला वन खात्याची परवानगी मिळाली व मुहूर्त ठरला पर्यावरण दिन, ५ जून २०१५, वन महोत्सवाची
तारीख निश्चित झाली. हातात दोन महिने, खिशात दमडीही नाही होता फक्त विश्वास की हा उपक्रम
आपण यशस्वी करू. म्हणता म्हणता अनेक हात मदतीला पुढे आले. दहा हजार पाचशे खड्डे करण्यात
आली प्रत्येक खड्डाशेजारी एक झाड ठेवण्यात आले संपूर्ण परिसर विभागला गेला. प्रत्येक
विभागात वन खात्याचे कर्मचारी व स्वयंसेवक लोकांच्या मदतीला ठेवण्यात आली. लोकांना
आव्हान करण्यात आले होते की वृक्षरोपण करण्यासाठी सकाळी साडे सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत यावे अट एकच होती की
येताना पाच लिटर पाणी घेऊन यावे ५ जून रोजी सकाळी साडे सहालाच लोकांनी मुख्यद्वारापाशी
रांग लावली तीन वाजता दहा हजार पाचशे झाडी लावून झाली होती. लोकांचे लोंढे तरीही चालूच होते लोकांचा आग्रह होता की आम्हीही
झाड लावणारच रोपटी होतीच परत आणखी पाचशे खड्डे खोदण्यात आली सायंकाळ पर्यंत एकूण ११०००
झाडे लावण्यात आली. पहिला टप्पा तर यशस्वी झाला होता मुख्य काम होते लोकांना सांगितल्याप्रमाणे
तीन वर्ष या झाडांची निगा राखून त्यांना जोपासणे. शनिवार रविवार आता शेखर गायकवाड यांचा
मुक्काम पोस्ट देवराईत असायला लागला.
पुढील वर्षी म्हणजेच पर्यावरण
दिनाचे औचित्य साधून पाच जून २०१६ रोजी वन खात्याच्या म्हसरूळ, नासिक येथील जागेत,
वनराईत त्याच पद्धतीने सहा हजार झाडे लावण्यात
आली.
अनेक लोक प्रश्न विचारात की आम्ही
लावलेली झाडे जगली की नाही लोकांमध्ये अजून जनजागृती करण्यासाठी व कामाची खात्री देण्या
साठी पाच जून २०१७, पर्यावरण दिनी देवराईतील ११००० झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
त्यांना एकच आव्हान करण्यात आलं होतं की भेट म्हणून खत आणा. येताना बरोबर फुलांच्या
पाकळ्या आणा व तुम्ही लावलेल्या झाडाभोवती त्याची रांगोळी काढा व या वृक्षांच्या सानिध्यात
आपला एक दिवस व्यतीत करा. जंगल निर्मिती करताना फक्त झाडेच नको, २०१८ मध्ये दहा-बारा एकर बाबा सानप उद्याना मध्ये ४८ प्रकारच्या १००० वेली लावण्यात आल्या ह्या उपक्रमास
शैलाजा सानप यांनी सढळ हस्ते भरघोस मदत केली.
सन २०१९ मध्ये वन खात्याच्या म्हसरूळ वनराईत ६००० वृक्ष
लावण्यात आली. २०२० मध्ये करोना असतानाही साडेआठशे
झाडी लावण्यात आली. २०२० मध्ये म्हसरूळ वनराईत १५१ कुंड लोकांच्या मदतीने तयार करण्यात
आली ज्यामध्ये ७५ कमळ आणि ७५ कमोदिनी लावण्यात आले. कंदमुळांची ही लागवड वनराईत करण्यात
आली देवराई मध्ये पारंपारिक भारतीय वन निर्मितीचा मानस आहे तो मोठ्या प्रमाणात यशस्वी
ही झाला आहे. एकूण दोन्ही क्षेत्र मिळून, ९० एकर जागेत २२० देशी वृक्ष प्रजातीचे ३२०००
वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
या कामासोबतच शेखर गायकवाड पक्षांची सुद्धा निघा राखतात
जखमी पक्षी हमखास त्यांच्या घरी आढळतात त्यांनी आत्तापर्यंत १७००० चिमणीच्या घरट्यांचे
वाटप केले आहे. अनेक संस्थानी शेखर गायकवाड ह्यांचा सत्कार आयबिएन लोकमत,
सार्वजनिक वाचनालय नासिक, बाॅश, नासिक,
नाशिक सिटीझन फोरम अशा अनेक संस्थानी केला.
ही उत्कट आवड जोपासताना त्यांना त्यांच्या घरच्यांची ही
भक्कम साथ लाभलेली आहे आपल्या व्यवसायाची व आवड ह्याची सांगड घालण्याच्या तारे वरच्या
कसरतीत ते यशस्वी झालेले आहेत. शेखर गायकवाड म्हणतात की सतरा अठरा किलोमीटर वनराईत
किंवा देवराई फिरल्यानंतरही कुठलाच थकवा जाणवत नाही तिथे गेल्यावर एक आत्मिक समाधान
मिळते. तिथे मला मी या जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे अशी अनुभूती होते
अशा या अवलियाला आजच्या वसुंधरा
दिनानिमित्त मानाचा मुजरा!
-
योगेश कासारपाटील
एम.
टेक. (पर्यावरण व जल संपदा)
संचालक, अजिंक्यतारा कंन्सलटंट्स


सुंदर लेखन, झाडांतच जगणारा
ReplyDeleteसच्चा वृक्षमित्र,
आणि म्हणून शिर्षक अत्यंत समर्पक ठरते !
धन्यवाद !